Monday, 5 March 2012

गुलाम आणि राजा.

आपल्याकडे असं सहसा होतं की एखाद्या कामासाठी नेमलेली व्यक्ती नेमलेल काम सोडून बाकी सगळ्या कामात इंटरेस्ट दाखवते...पण जे काम करायचा त्या व्यक्तीला पगार मिळतो ते काम करण्यात मात्र ती कुचराई करते.. किंवा ते काम केले तरी आपल्यावर भयंकर उपकार केल्याचा आव आणते....!!!

विशेषतः  सरकारी ऑफिसात तर याचा प्रत्यय येतोच. लायब्ररीत काम  करणारयाला नेमकी पुस्तकांची आवड नसते... बँकेत कस्टमर केअर मध्ये बसणारा चेहऱ्यावर माणूसघाणे भाव राखून असतो.  गँसचा नंबर लावणारी पोरगी फोनवरून उसंत मिळाल्यावर आपला नंबर लावणार. पोस्टात तर आपल्याकडे बघतच नाहीत. समोर आलेला माणूस हा टाईमपास म्हणून आला आहे अशी त्यांची समजूत असते. BSNL पोस्टपेडवाल्यांची  बिलं अर्धा- पाउण तास रांगेत उभं केल्यावरच घेतात....हा माझा स्वानुभव आहे.

पाण्याच्या बिलासाठी तुम्ही किती वेळ रांगेत उभ राहू शकता...? मी नागपूरच्या मार्च महिन्यात १०.३० ते १.३० असा ३ तास उभा होतो.  तसा सकाळी ९.०० ला रांगेत लागण्याचा प्रयत्न केला. पण तिथे प्रत्येकी ७०-८० लोकांच्या दोन रांगा होत्या. म्हणून ऑफिसातून हाफ डे घेतला. खरेतर, आणखी विंडोज उघडून त्यांना सोय करता आली असती. पण वर्षभर आम्हाला पाणी पाजणारे हे बाबू.!.. ते पाणी त्यांना ग्राहकांच्या घामातून वसूल करायचे होते ..!!! 


इन्कम टँक्स ऑफिस तर फारच कनवाळू... इथे ग्राहकांच्या तब्बेतीची फारच काळजी घेतली जाते. या पाच माजली बिल्डींगमध्ये टँक्सचे फॉर्म्स तळ  मजल्यावर...ते भरायचे कधी दुसऱ्या तर कधी तिसऱ्या मजल्यावर...पँनकार्ड पाचव्या माळ्यावर... लिफ्ट आहे.. कधी कधी सुरूही असते. पण मुख्य भर स्वावलंबनावर असतो... समोरचा बाबू  किवा बाबी केव्हा कसली झेरॉक्स मागतील हे सांगणं कठीण..पँनकार्ड काढायचे ऑफिस पाचव्या मजल्यावर .. पण त्याचे फॉर्म्स मात्र तुम्हाला .. तळ मजल्यावर सुद्धा नाही... तर.. बिल्डींगच्या बाहेर थोड्या समोर असणाऱ्या  झेरॉक्स सेंटर वर.. फ्री नाही...पाच रुपयात मिळणार... पुन्हा त्या बाबूचा मूड असला तर तुमचा फॉर्म accept  होणार.. नाहीतर.. तुमचं नशीब आणि खालीवर चकरा...!!!

बँकेत डिपोझीट स्लीपच नेमकी गायब..मग या टेबलापासून त्या टेबलपर्यंत टल्ले खा...  D.D.ची स्लीप कधी पांढरी..तर कधी गुलाबी..!! Withdrawal चा  काउंटर नेमका आपण रांगेत लागल्यावरच slow चालणार. !! पहिला नंबर लागेल म्हणून लवकर जावं तर त्याच दिवशी कँशियर लेट येतो...!!  


यावर आपण काहीच करू शकत नाही..  केवळ चरफडण्यापलीकडे ....!!! आपल्या हातात काही नसतच..आपण गुलाम....नेहमीचे.. निदान ब्लॉग वर तरी आपण राजे... खोटेखोटे का होईना...!! 



Saturday, 3 March 2012

प्रथमाग्रासे मक्षिकापातः

ब्लॉग सुरु करणे सोपे असले तरी ब्लॉगवर लिहित राहणे  हे फेसबुकवर status अपडेट करण्याइतके सोपे नसते. वर पुन्हा हे लिहिणे वाचनीय ही असलं पाहिजे. बरेच लोक फक्त ''माझापण ब्लॉग आहे'' हे सांगण्यापुरता ब्लॉग सुरु करतात.. फेसबुक वर तासंतास घालवणाऱ्या माझ्या काही मित्रांना ब्लॉग ही काय ''चीज'' आहे, हेच माहित नव्हतं..  हे लोक मोबाईलवर काळ वेळ न पाहता SMS फॉरवर्ड करतात., फेसबुकवर बहुतेक वेळा कोणा मुलीशी chat करत बसतात ..पण ब्लॉग लिहिणं जमत नसेल तर किमान वाचा तरी..असा म्हंटल्या बरोबर आउट ऑफ रिच होतात...

सर्वात महत्वाचे आहे ते ब्लॉग साठी गिऱ्हाईक शोधणे ..म्हणजे वाचक शोधणे.. आज  ''वाचक''  हा कन्सेप्टच नाहीसा झालाय.. मी फेसबुकवर काही मित्रांना माझ्या ब्लॉगवर येण्याचे आमंत्रण दिले..काही आलेसुद्धा... पण काहींनी ठेंगा दाखवला.. त्यांच्यासाठी ब्लॉग ही काही इंटरेस्टिंग गोष्ट नव्हती..काहींनी नंतर नक्की वाचीन..आज बिझी आहे... असे सांगून कटवले..  

काही मराठी मित्र आणि मैत्रिणी सुद्धा ब्लॉग चा विषय काढल्याबरोबर एकदम offline झाले... एका मराठी मैत्रिणी ने तर मजा केली... एरवी दिवसभर फेसबुक वर ''आय अँम बोअर्ड...अशा भयानक status पासून '' गोइंग टू शॉपिंग.. बॉट न्यू नेलपॉलिश... yippie '' असली status खरडणारी ही मैत्रीण.. ब्लॉगच नाव काढल्यावर ''सॉरी.. सो बोरिंग..नॉट इंटरेस्टेड..'' असा म्हणून गेली...!!! मराठीचा अभिमान बाळगणारयांनी आणि अमराठी लोकांच्या नावाने उगाच गळे काढणारयानी  इकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती. :))) 


एका बंगाली मैत्रिणीला ब्लॉगविषयी सांगितल्यावर तिने चांगला उत्साह दाखवला..मराठी येत नसूनही.!!! . तसाच एक गुजराती मित्रही आला...  .कहर म्हणजे... एक स्पँनिश मैत्रीण ...हिंदी शिकणारी.. तिने मराठी भाषेविषयी प्रचंड कुतूहल दाखवले... तिला न मराठीचा गंध...न धड हिंदीची वार्ता... पण काहीतरी creative  म्हणून तिने  उत्साह दाखवला... आणि आश्चर्य म्हणजे.. तिने मराठी ब्लॉग  translate करून वाचलाही..!!!  बरोबर आहे.. ती रिकामटेकडी असेल... कारण बाकीचे मराठी मित्रमैत्रिणी मात्र  भयंकर बिझी होते...!! 

 अशा अचानक व अकल्पित प्रतिसादामुळे ब्लॉगची वाटचाल निर्विघ्नच राहणार याबद्दल आमच्या मनात तिळमात्रही शंका नाही. ..!

Friday, 2 March 2012

ब्लॉग लिहिण्यास कारण की, ..

 खरे तर आम्ही ब्लॉग का लिहावा .. आम्ही काही कुणी सेलेब्रिटी नाही.. आम्हास आमच्या कॉलनीत सुद्धा फारसे कुणी ''पेहचानत'' नाही. पण ज्याप्रमाणे माधुरी दिक्षितसारखी अँक्टिंग येत नाही म्हणून बिपाशा बसूने अँक्टिंग करूच नये का ? त्याप्रमाणे आम्ही सुद्धा सेलेब्रिटी नसलो तरी ब्लॉग लिहूच नये का?

ब्लॉग हा फक्त वादग्रस्त व्यक्तींनी लिहायचा असतो असा आमचा पूर्वग्रह होता. मग आम्ही निरनिराळ्या वादात अडकण्याचा प्रयत्न केला.. घरी, ऑफिसात, मित्राशी काही वाद घालून पहिले. पण ''वादग्रस्त व्यक्ती'' असं  लेबल काही केल्या लागलं नाही. उलट, फालतू बडबड करू नको बे. असा प्रेमळ सल्ला मिळाला.. असो.

मध्यंतरी मराठी भाषा दिन येऊन गेला. तो जागतिक वगैरे असल्याचे इंग्रजी पेपरमधून कळले. ते निमित्त साधून आम्ही ब्लॉग मराठीतच लिहिण्याची प्रतिज्ञा केली. मराठीच्या जागतिकपणाचा गर्व आम्हास झाला. आमची छाती अभिमानाने फुलून आली. काही विद्वान उठसूठ मराठी भाषा रसातळाला जात असल्याची आवई उठवतात.. आता ही मराठी.. जागतिक भाषा... इतकी अगतिक कशी असेल ?? त्यामुळे आजचा एक दिवसतरी मराठीतच बोलावे असे आम्ही ठरवले.आणि एकदा आम्ही ठरवले कि बस .. आय बिकम अनस्टॉपेबल...!!!  

सुरुवातीला वाटले, आपण लिहिलेले वाचणार कोण? वाचायला वेळ आहे कुणाकडे? मोबाईल,कॉम्प्युटर, इंटरनेटच्या जीव घाबरवून टाकणाऱ्या गर्दीत वाचनाची आवड किती  लोकांकडे उरलीये??. त्यात जर काही सनसनाटी, चटपटीत काही असेल तरच लोक वाचणार..  साध्यासरळ बातम्या सुद्धा लोक ऐकत नाही आता.. बातम्यांचं नाट्य रुपांतर करावं  लागतं हल्ली..   T.R.P च्या स्पर्धेत सतत भावनेला हात घालणारं,  नाट्यमय, अतिरंजित पाहायला सरावलेले आपले डोळे.. त्यामुळे हे लेखन अळणी वाटण्याचीच शक्यता अधिक ...   .

तरीसुद्धा, आम्ही न डगमगता, मराठीत लिहिण्याचा वज्रनिर्धार केला आहे.. दुसरा कुठलाही निर्धार आता ह्यापुढे तुच्छ आहे .. .. !! कुठल्याही संकटांची तमा न बाळगता, slow internet ला न जुमानता, load shading वर मात करून ...  (आणि अर्थात नोकरी सांभाळूनच.... हो. ब्लॉग लिहून पोट थोडीच भरणार....!! )  आम्ही ही दैनंदिनी लिहिण्याचे योजिले आहे.. 

ही सर्व उठाठेव करताना आम्हास अत्यंत गहिवरून येत आहे.. फार पूर्वी शाळेत गणितात काठावर पास झाल्यावर आम्हास असेच गहिवरून येत असे. तो आनंद ... आणि हा आजचा..!!!

अखेरीस ,आम्ही नम्रपणे व प्रामाणिकपणे सांगू इच्छितो कि मराठीत चार ओळी लिहून साहित्य सेवा वगैरे करावी असा भव्य व उदात्त हेतू आमचा नसून, विसरत चाललेल्या मराठीत काही waves  व्यक्त कराव्यात  व चार लोकात मोठेपणा मिरवावा असा शुद्ध स्वार्थी हेतू मनाशी बाळगून हा ब्लॉग सुरु करत आहोत...!!